नेपाळमध्ये अराजक ! कायदे मंत्र्यांचं घर पेटवलं, ९ मंत्र्यांचा राजीनामा
नेपाळमध्ये अराजक ! कायदे मंत्र्यांचं घर पेटवलं, ९ मंत्र्यांचा राजीनामा
img
वैष्णवी सांगळे
भारताचा अजून एक शेजारी अस्थिरतेच्या गर्तेत अडकला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशानंतर आता नेपाळचा क्रमांक लागला आहे. येथे दोन दिवसांपासून अराजकता माजली आहे. आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपतींचे खासगी निवास स्थान आणि मंत्र्यांच्या घरात तोडफोड केली आणि आग लावण्याचा प्रयत्न केला. 

या आघाडी सरकारमधून अनेक मंत्री राजीनामा देऊन पळ काढत आहेत. आतापर्यंत नऊ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. गृह,आरोग्य, कृषी आणि परराष्ट्रमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तर नेपाळी काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांनी पदावर पाणी सोडले आहे. उप पंतप्रधान प्रकाश मान सिंह यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे.नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदीविरोधात Gen-Z अर्थात तरुणाईने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज त्यांनी थेट कायदेमंत्र्यांचं घरच पेटवून दिलं. 

सरकारची ध्येयधोरणं आणि सोशल मीडियाबंदीविरोधात तरुणाईची भूमिका यावरुन हे राजीनामासत्र सुरु आहे. तिकडे नेपाळमधील बीरगंज इथं नेपाळ सरकारचे कायदेमंत्री अजय कुमार चौरसिया यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं. नेपाळमधील या आक्रमक आंदोलनानंतर मोठा हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये आतापर्यंत २५ पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. 

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी सोमवारी संध्याकाळी 6 वाजता सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यांनी सांगितले, "मी सध्याच्या परिस्थितीचे मूल्यमापन करून त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित पक्षांशी संवाद साधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संध्याकाळी 6 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या कठीण काळात शांतता राखावी, अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो."
इतर बातम्या
Join Whatsapp Group