रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ३५ महिला अन् २३ पुरूष असे ५८ भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले. लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले. मात्र, काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आले. भाविकांनी गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, त्यांची फसवणूक झाली होती.
तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकावयला सुरूवात केली. परराज्यात या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न या भाविकांसमोर उभा राहिला. त्यांनी ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएंना फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना.
सर्वप्रथम फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना कळविले. त्यांनी स्वत: भाविकांची भेट घेतली व सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता.
भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. आता त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली.
ट्रॅव्हल्स कंपनीच्या फसवणूकीमुळे नेपाळमध्ये अडकलेल्या ५८ पर्यटकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात पुढे केला अन् त्यांना सुखरुप राज्यात आणण्यास मदत केली. देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे नेपाळपासून ते रायगडपर्यंत या भाविकांचा प्रवास सुखकर झाला. उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेने काठमांडूमध्ये देवेंद्रचं आमच्या मदतीला धावून आले अशी कृतज्ञ भावना या पर्यटकांनी व्यक्त केली आहे.
पर्यटकांनी मानले आभार
रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करू दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण सुखरुपपणे मुंबईला पोहोचले. अत्यंत कठीण परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीमुळे भाविक भारावून गेले होते. एका मेसेजवर देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले. नेपाळपासून ते उत्तरप्रदेशपर्यंत आपल्या संपर्काचा वापर करून आम्हाला सुखरुप घरी पोहोचविले अशी कृतज्ञ भावना भाविकांनी व्यक्त केली.