भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मोठे अराजक माजले आहे. वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे तेथील जनता चांगलीच आक्रमक झाली असून अनेक ठिकाणी जाळपोळ केली जात आहे. यानंतर सरकारने थेट एक निवेदन जारी करून ही बंदी उठवल्याचे जाहीर केले. हिंसक संघर्षांनंतर हे पाऊल उचलण्यात आले, ज्यामध्ये २५ पेक्षा अधिक निदर्शकांचा मृत्यू झाला असून ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. सरकारकडून लोकांना शांत राहण्याचे आव्हान करण्यात येत होते.
नेपाळमधील याच अराजकाची नैतिक जबाबदारी घेऊन ८ सप्टेंबर रोजी तेथील गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आता नेपाळमधूनच मोठी माहिती समोर येत आहे. नेपाळमधील जनतेने तेथील सत्ता उलथवून लावली असून आता तेथील पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केपी ओली यांच्या राजीनाम्यामुळे आता काठमांडूमध्ये जल्लोष केला जातोय.
पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याआधी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी जेनझींच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. देशाच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्यांनी आपल्या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता केपी शर्मा ओली यांनीही पंतप्रधानपदापासून दूर होण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला आहे.