देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्षे झाली. भारत एकीकडे डिजिटल इंडियाचा जोर धरत असताना दुसरीकडे आजही गावखेड्यात, वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना यातना सोसाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात मृत्यूनंतरही मरणयातना सोसाव्या लागत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. दाभोळवाडी आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना स्मशानभूमीत पत्रेच नसल्याने चक्क पावसात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे, प्रशासनाचा आंधळेपणा आणि आपटा ग्रामपंचायतचा विचित्र कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील दाभोळवाडी येथील महिला गिरजी गणा वाघे यांचे नुकताच निधन झाले, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीला पत्रे नसल्याने भर पावसात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले. या घटनेमुळे आपटा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील स्मशानभूमीला पत्रेच नसल्यामुळे पावसात मृतदेहावर पत्रे वरती धरून अंत्यसंस्कार करावे लागले. या घटनेमुळे आदिवासी समाजाने आपटा ग्रामपंचायत आणि प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहेत.