रायगड : बटाटा वड्यामध्ये मीठ जास्त पडल्याची तक्रार करणे ग्राहकाच्या कुटुंबालाच महागात पडले आहे. माणगावमध्ये जोशी वडेवाले यांचे हॉटेल आहे. ते हॉटेल शुभम जैसवाल हे चालवतात. इथं वडापाव खाण्यासाठी हेलगावकर कुटुंब आलं होतं. मात्र बटाटा वड्यात मीठ जास्त असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी त्याची तक्रार त्याच वेळी शुभम जैसवाल यांच्याकडे केली. त्याचा राग जैसवाल यांना आला.
त्यातून एकमेकांत बाचाबाची झाली. शेवटी अंकीत हेलगावकर यांच्यासह काव्या हेलगावकर यांच्यावर जैसवाल यांनी हल्ला केला. यावेळी हॉटेलमध्ये कामासाठी असलेले इतर पाच जणांनीही मारहाण केल्याचा आरोप हेलगावकर यांनी केला आहे. त्यांना फायबरच्या खुर्चीने मारण्यात आल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
माणगावमध्ये सकाळी नऊ वाजता हेलगावकर कुटुंब नाश्ता करण्यासाठी जोशी वडेवाले यांच्या हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांनी वडापावही घेतले. मात्र त्या वड्यामध्ये मीठ जास्त होते. याबाबत काव्या यांनी हॉटेल चालक जैसवाल यांना सांगितले. त्यातून एकमेकांमध्ये हमरीतूमरी झाली. त्यात त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. तिथे उपस्थित असलेल्या अंकीत यांनीही हॉटेलची चुक सांगितली. पण हॉटेल चालक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने थेट हाणामारीला सुरूवात केली. फायबरच्या खुर्चीने यांना मारण्यात आलं.
हॉटेलमध्ये असलेल्या पाच कर्मचाऱ्यांनीही या दाम्पत्याला मारहाण केली. शिवाय हॉटेल चालकाची आई, बहीण आणि वडील यांनीही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत काव्या यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. शिवाय कानातले मोडले. यानंतर काही लोकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवलं. त्यानंतर जैसवाल, त्याचे आई, वडील, बहीण आणि पाच कामगार यांच्या विरोधात माणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. याबाबत पोलीसांनी तक्रार दाखल केली आहे.