पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातुन समोर आली आहे. पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील शिळफाटा परिसरातील मीळ गावामध्ये ही घटना घडली आहे. असरद अली (३४ वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. असरद अली आपल्या पत्नी आणि मुलांसोबत मीळ गावातील नवीन वसाहतीत राहत होता. रविवारी पहाटे असरद अलीची हत्या झाली. असरद अली हा क्रेन ऑपरेटर होता. रविवारी पहाटे असरदची पत्नी दरवाजामध्ये जोरजोरात रडत बसली होती. तिचा आवज ऐकून शेजारी राहणाऱ्या लोकांनी असरदच्या घराकडे धाव घेतली.
असरद रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता तर त्याच्या मुलीचे हात रक्ताने माखलेले होते. हे चित्र पाहून शेजारी राहणाऱ्यांना धक्का बसला. स्थानिकांनी तात्काळ यासंदर्भात खोपोली पोलिसांना माहिती दिली. खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता असरदच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली असल्याचे समोर आले. पोलिसांनी असरदचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला.
पोलिसांनी यावेळी असरदच्या पत्नीची विचारपूस केली तर तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. यावेळी पोलिसांनी श्वान पथकाला देखील घटनास्थळी पाचारण केले होते. श्वासाने असरदच्या घरामध्ये सगळीकडे वास घेतला. त्यानंतर श्वास असरदच्या पत्नीच्या जवळच जाऊन थांबला. त्यामुळे पोलिसांनी असरदच्या पत्नीला अनेक प्रश्न केले पण तिने व्यवस्थित उत्तरं दिली नाही त्यामुळे त्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
असरदच्या पत्नीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करत तिला अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.