नवी मुंबईतील उरण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण-पनवेल मार्गावर एका २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव असून तिच्या छातीवर आणि अंगावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.
पोलिसांनी यशश्री हिचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी उरण येथील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री शिंदे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शनिवारी सकाळच्या सुमारास उरण-पनवेल मार्गावरील रस्त्यालगत यशश्रीचा मृतदेह आढळून आला. प्रेमसंबंधातून तिची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. हत्या करणाऱ्या आरोपीने यशश्रीच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार केल्याचं समजतंय.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी केली आहे.