दिल्लीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानंतर राज्यातील एटीएस पथकाकडून ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. दिल्ली स्फोटाचे धागेदोर महाराष्ट्रात असण्याच्या संशयावरून शोध मोहीम हातात घेण्यात आली आहे. दिल्ली स्फोटाच्या आधी अटक केलेल्या चार डॉक्टरांचे महाराष्ट्रात काही संबंध आहेत का? याचा देखील शोध सुरू करण्यात आला आहे.
अटक केलेले ४ डॉक्टर महाराष्ट्रात आले होते का? या अनुषंगाने एटीएसकडून तपास केला जात आहे. डॉ मुजम्मिल शकील, डॉ आदिल अहमद, डॉ अहमद सय्यद आणि डॉक्टर शाहीन शाहिद या चार जणांना देशातून विविध भागातून अटक केली आहे.
मंगळवारी मुंब्रा येथे शिक्षकाच्या घरात धाड टाकली होती. तर आज महाराष्ट्र एटीएसने पुण्यातील कोंढवा भागात छापेमारी केली. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्यासोबत संपर्कात असल्याच्या संशायवरून त्याला ताब्यात घेण्यात आलेय. दरम्यान, जुबेर हंगरगेकर याला काही दिवसांपूर्वी एटीएसने अटक केली होती.
यापूर्वी महाराष्ट्र एटीएसकडून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पुण्यात एटीएसने केलेल्या कारवाईत काही संशयितांना अटक करण्यात आली होती.
या आरोपींच्या चौकशीत मुंब्रा येथे राहणाऱ्या एका शिक्षकाचा संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर एटीएसने ही धाड टाकली. संबंधित शिक्षकाला अधिक चौकशीसाठी मुंबईतील कुर्ला परिसरातील त्याच्या दुसऱ्या घरात नेण्यात आले असून, तिथे एटीएसची तपास मोहीम सुरू आहे.