देश विघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयातून महाराष्ट्रात NIA आणि ATS ने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मालेगावसह छत्रपती संभाजीनगर, आणि जालन्यामधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून देश विघातक कृत्यांमध्ये या तरुणांचा संबंध असल्याचा संशय आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई सुरू आहे
मालेगावसह छत्रपती संभाजीनगर, जालन्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने संयुक्तरित्या छापे टाकून दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या मौलवीसह काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मालेगावातील एका तरुणाचा समावेश असल्यामुळे मालेगाव पुन्हा एकदा दहशतवादाचे केंद्र बनले आहे.
नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपासून दहशतवादी कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या हालचाली सातत्याने वाढत आहेत. विशेष करून मालेगाव व अहमदनगर परिसरामध्ये या हालचालींना काही दिवसांपासून वेग आला आहे. त्या दृष्टिकोनातूनच मधल्या काळात राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने छापे टाकून काही जणांना अटक केली होती.
आता पुन्हा मालेगावमध्ये आज पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा व दहशतवादविरोधी पथकाने संयुक्तपणे कारवाई करून आझाद रोडवर असलेल्या एम. एस. इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचा मालक डॉ. ए. के. अब्दुल्ला याला अटक केली आहे. अब्दुल्ला याचे युनानी क्लिनिक आहे. यामध्यमातूनच तो दहशतवादी संघटनांशी जोडला गेला असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा व दहशतवादविरोधी पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथे छापा टाकून आज सकाळी येथील मौलवी हाफीज याच्यासह अन्य तीन जणांना ताब्यात घेतले आहे. जालन्यातही अशीच कारवाई करण्यात आली असून या ठिकाणाहूनही काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.