राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश उर्फ भाऊ दरोडा याचे दुर्दैवी निधन झाले आहे. हरीश दरोडा हा कोट्यवधी रुपयांच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान कारागृहात हरीशला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळं हरीशला उपचारासाठी मुंबईतील जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण ठाणे जिल्हा आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश
शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रातील तब्बल पाच हजार क्विंटल भाताची अफरातफर केल्या प्रकरणी हरीश दरोडा याच्यावर किन्हवली पोलीस ठाण्यात डिसेंबर 2023 ला गुन्हा दाखल झाला होता. तर काही महिन्यापूर्वीच वाजत गाजत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मृत हरीश दरोडा याचा प्रवेश सोहळा पार पडला होता. मात्र त्यानंतर आमदाराच्या पुतण्याला पोलिसांनी 9 डिसेंबरला अटक केली होती. तेव्हापासून हरीश दरोडा कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत होता.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर आदिवासी विकास महामंडळ हे गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. या प्रकरणात केवळ हरीश दरोडाच नव्हे, तर अनेक बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. यावेळी शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या चलन पावत्या तयार करून शासनाची दीड कोटींची फसवणूक करण्यात आली. तसेच या प्रकरणात साकडबाव संस्थेचे सचिव संजय पांढरे, केंद्रप्रमुख जयराम सोगीर, जव्हारचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यासह इतर ६-७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या ३ वर्षांत शहापूर पट्ट्यात जवळपास १६ कोटींचे भात घोटाळे उघडकीस आले आहेत.
दरम्यान आमदार दौलत दरोडा यांच्यासाठी हा मोठा कौटुंबिक आणि राजकीय धक्का मानला जात आहे. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरीकडे पुतण्याचा कोठडीत झालेला मृत्यू, यामुळे शहापूरच्या राजकारणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.