एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला धक्का, 'या' विश्वासू माजी आमदाराने सोडली साथ.....
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला धक्का, 'या' विश्वासू माजी आमदाराने सोडली साथ.....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले असताना, अशातच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरुन एकीकडे सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी घडत आहेत, तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्येही उलथापालथी होत आहेत. विधानसभा निवडणुकीला वर्ष बाकी असताना नेत्यांच्या पक्षबदलीला सुरुवात झाल्याची चित्र आहे.  एकीकडे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 

शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा  यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा गुरुवारी 19 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

पांडुरंग बरोरा यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.  शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दौलत दरोडा आहेत. दौलत दरोडा हे अजित पवार गटात आहेत.त्यामुळे आता शहापूरमध्ये येत्या निवडणुकीत दौलत दरोडा यांच्यासमोर पांडुरंग बरोरा यांचं आव्हान उभं राहतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

दुसरीकडे पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार हे शहापुरात जाहीर सभा घेणार आहेत. 

कोण आहेत पांडुरंग बरोरा? 
पांडुरंग बरोरा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानसभेवर गेले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. 1980 पासून पवार कुटुंबासोबत असलेल्या शहापूरमधील बरोरा कुटुंबाने पक्षासोबत फारकत घेतली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला होता. त्यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यासोबत बरोरा यांची जवळीक होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group