अमेरिका इराण युद्ध सुरु आहे. या युद्धाचा फटका भारताला बसताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर ही अफवा वाऱ्यासारखी पसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या एका मेसेजमुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी आणि जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.
उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती?
नाशिकच्या येवला आणि लासलगाव परिसरात सोशल मीडियावर रात्री ११ वाजता पेट्रोल बंद होणार असे मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली. हे मेसेज व्हायरल झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात नागरिक झोपेतून उठून वाहने घेऊन पंपावर पोहोचले. यामुळे रात्री १२ वाजेच्या सुमारास येवल्यातील सर्वच पंपांवर अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली.
तर दुसरीकडे जळगावाच्या मोहाडी रोड परिसरातील एका पंपावर दोन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक होता. मात्र या अफवेमुळे अचानक नागरिकांनी गर्दी केली. या गर्दीमुळे हा साठा अवघ्या ५ तासात संपला. आता येथे केवळ डिझेल शिल्लक असून पेट्रोलच्या मशीनला बॅरिगेटिंग करून मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच धुळे शिरपूर येथे पेट्रोल संपण्याच्या भीतीने प्रशासनाने आणि पंप चालकांनी प्रति वाहन फक्त १०० रुपयांच्या पेट्रोलची मर्यादा घातली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापुरात काल एकाच दिवसात पेट्रोल विक्रीत ३० टक्क्यांची वाढ झाली. परिणामी, आज शहरातील आणि उपनगरातील बहुतांश पंप कोरडे पडले आहेत. साध्या पेट्रोलचा साठा संपला आहे. तसेच साताऱ्यातील कराड येथेही रात्रीपासूनच नागरिकांनी पंपांवर गर्दी केली. एकाच वेळी सर्वांनी गर्दी केल्यामुळे साठा संपत आहे, पुरवठ्यात अडचण नाही, असे स्पष्टीकरण येथील पंप चालकांनी दिले आहे.
भारताकडे पुरेसा साठा
दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानेही पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, भारताकडे पुरेसा साठा आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून पॅनिक बाइंग म्हणजेच संपेल या भीतीने घाबरून केलेली आहे, असे प्रजित नायर यांनी स्पष्ट केले.