नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी सोमवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, डिप सी प्रोजेक्ट अंतर्गत पहिल्यांदा तेल बाहेर काढण्यात आले आहे. आंध्र प्रदेशच्या काकीनाडा किनाऱ्यापासून ३० किलोमीटर अंतरवर ७ जानेवारी रोजी हे इंधन तेल काढण्यात आले आहे.
हरदीप सिंग पुरी म्हणाले, "काकीनाडा किनार्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कृष्णा गोदावरी खोऱ्यात काल पहिल्यांदा तेल काढण्यात आले. यावर काम 2016-17 मध्ये सुरू झाले होते. मात्र कोविडमुळे थोडा विलंब झाला," असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
दरम्यान यावेळी “आमच्याकडे फार कमी वेळात गॅसही उपलब्ध होणार आहे. तसेच मे आणि जूनपर्यंत, आपण दररोज 45,000 बॅरल उत्पादन करू शकू, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितले. हे उत्पादन आपल्या देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या 7 टक्के आणि वायू उत्पादनाच्या 7 टक्के असेल."
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ओएनजीसीने बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यात केजी-डीडब्ल्यूएन-98/2 ब्लॉक मधून पहिले तेल उत्पादन सुरू केले आहे. ज्या ठिकाणी तेल काढले जात आहे, ते ठिकाण कृष्णा गोदावरी खोऱ्यातील काकीनाडाच्या किनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे.
याचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक्स पोस्टवर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले; “भारताच्या उर्जा प्रवासातील ही अत्यंत उल्लेखनीय पायरी आहे आणि यातून आत्मनिर्भर भारत उभारणीच्या आमच्या अभियानाला मोठी चालना मिळाली आहे. या उपक्रमामुळे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी देखील बरेच लाभ होणार आहेत.”
दरम्यान, जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक असलेला भारत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी जागतिक बाजारपेठेतील विविध स्त्रोतांकडून आयात केलेल्या कच्च्या तेलावर अवलंबून आहे.