पेरू तोडल्याची चिमुकलीला मिळाली भयंकर शिक्षा,  साखळदंडाने  बांधलं अन... माजी सैनिकाला बेड्या
पेरू तोडल्याची चिमुकलीला मिळाली भयंकर शिक्षा, साखळदंडाने बांधलं अन... माजी सैनिकाला बेड्या
img
वैष्णवी सांगळे
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील बेहडाला गावात धक्कादायक घडली आहे.  एका लहान मुलीने झाडाचा पेरू तोडला म्हणून तिला चक्क साखळदंडाने  बांधून क्रूरपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. एका माजी सैनिकाने केलेल्या या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, देशभरातून या माजी सैनिकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही एका स्थलांतरित कुटुंबातील आहे. आरोपीच्या घराबाहेर असलेल्या झाडाचे मुलीने पेरू तोडले. हे पाहिल्यानंतर निवृत्त सैनिकाने तिला फरफटत घरामध्ये नेले. तेथे तिला जिन्याच्या लोखंडी खांबाला साखळदंडाने बांधून ठेवत अमानुषपणे मारहाण केली.

व्हिडिओमुळे प्रकार उघडकीस
मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या रोहित नावाच्या एका स्थानिक तरुणाने हा सर्व प्रकार पाहिला आणि त्याचा व्हिडिओ केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही चिमुरडी रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी आपल्या कृत्याचे समर्थन करताना दिसत असून, "हिने पेरू चोरले आहेत," असे ओरडून सांगत आहे. यावेळी व्हिडिओ करणाऱ्या तरुणाने आरोपीला जाब विचारत या कृत्याबद्दल सुनावले.

रोहितने तत्काळ चाईल्ड हेल्पलाईन आणि स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने आरोपीची चौकशी केली असून पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. पीडित कुटुंबाचे जबाब नोंदवण्यात आले असून, आरोपी निवृत्त सैनिकावर कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उना पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत तातडीने तपासचक्रे फिरवली आणि आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीविरुद्ध BNS (भारतीय न्याय संहिता) आणि JJ Act (जुवेनाईल जस्टिस ॲक्ट) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, विशेषतः अल्पवयीन मुलांसोबत असे वर्तन करणे हे मानवी संवेदनांच्या विरुद्ध आहे," असे जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group