कुस्तीपटू विनेश फोगटसह संपूर्ण देश पॅरिस ऑलिम्पिक मधील अपात्रतेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मंगळवारी १३ ऑगस्टला याबाबत निर्णय देऊ असे सांगितले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ६ ऑगस्टला जपानच्या युई सुसाकीविरुद्धच्या विजयासह विनेशने सलग तीन विजय मिळवत महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. विनेशला सुवर्णपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँडविरुद्ध सामना खेळायचा होता. पण या विजेतेपदाच्या लढतीतून विनेशला अतिरिक्त वजनामुळे बाहेर पडावे लागले. सकाळी तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.
दरम्यान , विनेशसह संपूर्ण देश या अपीलाच्या निर्णयाची वाट पाहत आहे, परंतु आतापर्यंत फक्त 'तारीखानंतर तारीख ' मिळत आहे. आधी यावर निर्णय ऑलिम्पिक संपल्यानंतर येणार होता, तर आता हा निर्णय खेळ संपल्यानंतर 2 दिवसांनी येईल आणि तो दिवस 13 ऑगस्ट आहे. विनेशला पदक मिळणार की, नाही हे आज (१३ ऑगस्ट) रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होईल.
विनेशच्या हक्कासाठीच्या लढ्यावरही सुनावणी झाली आणि आता अनेकवेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर मंगळवारी, १३ ऑगस्ट रोजी न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. पॅनेलने पक्षकारांचे आधीच ऐकले आहे, ज्यांना सुनावणीपूर्वी त्यांचे तपशीलवार कायदेशीर युक्तिवाद दाखल करण्याची आणि नंतर तोंडी युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली होती.
विनेशची ही मागणी या आधारावर आहे की, तिने एका दिवसापूर्वी उपांत्य फेरीसह तिचे सर्व तीन सामने ५० किलोच्या निर्धारित वजन मर्यादेत राहून खेळले होते आणि तिन्ही जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. फायनलच्या दिवशीच तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे तिला केवळ अंतिम फेरीतूनच अपात्र ठरवण्यात यावे, संपूर्ण स्पर्धेतून नाही.