पॅरिस येथे झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही घवघवीत यश मिळवलं होतं. महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूंसाठी महाराष्ट्र शासनाने बक्षीसाची घोषणा केली होती. आता पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने ५० मीटर रायफल ३ पोझिशन क्रीडा प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली होती. यासह पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील गोळाफेक क्रीडा प्रकारात सचिन खिलारीने देखील पदकाला गवसणी घातली होती. यासह स्वप्नील कुसळेच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे आणि सचिन खिलारी याचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.
राज्य शासनाने नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांच्या पारितोषिकाच्या रकमेमध्ये वाढ केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी क्रीडा प्रकारात कास्यंपदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळेला २ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
तसेच त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांचा देखील २० लाख रुपये देऊन सन्मान करण्यात आला. यासह पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी यास ३ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.