"कोलकात्यात असा कायदा आणू, ज्यात अत्याचाराची केस १० दिवसांत संपेल" ; काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
img
Dipali Ghadwaje
कोलकातामधील डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर टीकेची झोड उठली असून सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने ममता सरकारचे वाभाडे काढले होते. अशातच आता या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारने महिला सुरक्षेबाबत मोठे पाऊल उचलले असून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ७ दिवसातच फाशी होण्याबाबतचे नवीन विधेयक आणले जाणार आहे.

कोलकातामधील ट्रेनी डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या घटनेवरून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या घटनेमध्ये कारवाईत दिरंगाई केल्याने ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसवर चौफेर टीका होत आहे तसेच भाजपच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे, अशातच ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली असून महिलांच्या सुरक्षेबाबत मोठे विधायक आणले जाणार असल्याचे सांगितले आहे. 

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? 

भाजपच्या राज्यव्यापी बंद दरम्यान बोलताना ममता बॅनर्जी यांनी सरकार पुढील आठवड्यात विधानसभेचे अधिवेशन बोलवणार आहे. यामध्ये 10 दिवसांच्या आत बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी विधेयक मंजूर केले जाईल. आम्ही हे विधेयक राज्यपालांकडे पाठवू. तो मंजूर न केल्यास राजभवनाबाहेर आंदोलन करू. हे विधेयक मंजूर झालेच पाहिजे आणि यावेळी ते जबाबदारीतून सुटू शकत नाही, असे म्हणत नवा कायदा आणण्याची घोषणा केली आहे.

२ सप्टेंबरपासून पश्चिम बंगाल विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात ममता बॅनर्जी ३ सप्टेंबरला हे विधेयक मांडणार आहेत. या विधेयकानुसार अत्याचार करणाऱ्या आरोपीला ७ दिवसात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केली जाणार आहे. भाजपला न्याय नको आहे, ते फक्त बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा विचार करून पश्चिम बंगाल सरकार बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये फाशीच्या शिक्षेसाठी कठोर कायदा आणणार आहे. कोलकात्यात असा कायदा आणू, ज्यात अत्याचाराची केस १० दिवसांत संपेल, असे त्या म्हणाल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group