राज्यात पावसाच्या सरींनी धुमाकूळ घातल्यानंतर आता नैऋत्य मान्सून आणि अवकाळी पाउस परतीचीच वाट धरातना दिसत आहे. दाना चक्रीवादळामुळं मुंबईसह महाराष्ट्रावर होणारे परिणामसुद्धा बहुतांशी कमी झाले आहेत. ज्यामुळं आता येणारे दिवस राज्यात नेमकं कसं हवामान असेल याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे .
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या दिवाळीत एकिकडे गुलाबी थंडी चाहूल देताना दिसली तरीही काही भागांमध्ये मात्र पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे.
पुढील 24 तासांमध्ये राज्यात विदर्भ आणि नजीकच्या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे. तर, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यानं तापमानाच वाढ झाल्याचं जाणवणार आहे.
एकंदरच राज्यातील कमाल आणि किमान तापमानात दरम्यानच्या काळात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काहीशी घट होणार असून, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे. तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधूनही पावसानं केव्हाचीच माघार घेतली असून, आता तापमानत घट होण्यास सुरुवात झाली आहे. हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींनी आता वेग धारण करण्यास सुरुवात केल्यामुळं हवेत गारवा जाणवू लागला आहे.