महाराष्ट्रात आजपासून पुढील 5 दिवस कोकणासह गोव्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील काही भागात आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजननं दिलाय.
दरम्यान , या आठवड्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या घाटक्षेत्रात मुसळधार ते अतिवृष्टी सुदृश्य पावसाची शक्यता आहे. त्यामुळं या भागाला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आलाय. मंगळवारपासून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सोबतच मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत दिवसभरात विविध केंद्रांवर 5 ते 10 मिमी पाऊस झाला. बहुतांश ठिकाणी स्प्लॅटरिंगची नोंद झाली. आकाश ढगाळ असलं तरी पाऊस फारसा पडत नाहीये. त्यामुळं आर्द्रतेमुळं उष्मा वाढला असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, जून महिन्याच्या सुरुवातीला तीन आठवडे म्हणजे 1 जून ते 23 जून या दरम्यान पावसाची सरासरी पाहिल्यास कोकण किनारपट्टी भागात देखील अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अल्पावधीत अनुक्रमे 9 टक्के आणि 40 टक्के जास्त पावसाची नोंद झालीय. विदर्भात 16 टक्के पाऊस कमी झाला आहे.
येत्या आठवडाभरात होणाऱ्या पावसामुळं कोकण आणि विदर्भात ही तूट कमी होण्याची शक्यता असून मुंबई शहरात 43 टक्के कमी, तर उपनगरात 46 टक्के कमी पाऊस झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.