पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यासह अनेक स्टार क्रिकेटर्सनी सुद्धा या हल्ल्याबाबत रोष व्यक्त केला.
आता भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने सुद्धा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवादी हल्लावर मंगळवारी पार्थिव पटेल, गौतम गंभीर, हरभजन सिंह, आकाश चोप्रा, शुभमन गिल, नमन धीर इत्यादी भारतीय क्रिकेटर्स व्यक्त झाले होते. तर आता विराट कोहलीने देखील या हल्ल्याचा निषेद करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून, 'पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या भयानक हल्ल्याने खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना. या क्रूर कृत्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळो आणि त्यांना न्याय मिळो अशी प्रार्थना' असे म्हटले.
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने सुद्धा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप लोकांवर झालेल्या निर्दयी दहशतवादी हल्ल्याबद्दल ऐकून मन दुखावले. त्यांच्या कुटुंबियांसाठी मनापासून प्रार्थना आणि संवेदना. हा एक भयानक हल्ला आहे जो कधीही विसरला जाणार नाही'.
विराट कोहली वगळता टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर सुद्धा यावर व्यक्त झाला होता. त्याने एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत म्हटले की, ''दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो. यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांना याची किंमत चुकवावीच लागेल. भारत नक्कीच प्रहार करेल'.