भारत -पाकच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल क्रिकेट सामन्यांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलचे उर्वरित सामने एका आठवड्यासाठी स्थगित कऱण्यात आले आहेत. तर एका आठवड्यानंतर आयपीएलच्या उर्वरित सामन्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे BCCI कडून सांगितले जात आहे.
दरम्यान, आयपीएल क्रिकेट सामन्यातील आणखी १६ सामने शिल्लक आहेत. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे उरलेले सामने एका आठवड्यासाठी स्थगित कऱण्यात आले आहेत. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाला इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून अधून मधून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला
एका आठवड्यानंतर उर्वरित सामन्यांसंदर्भात आयपीएलचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. तर पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांमुळे गुरुवारी जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा ५८ वा सामना १०.१ ओव्हर नंतर थांबवण्यात आला आणि रद्द करण्यात आला होता आणि खेळाडूंना दिल्लीत आणण्यात आलं होतं. आयपीएलमध्ये एकूण ७४ सामने खेळण्यात येणार आहेत. 22 मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकत्ता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळण्यात येणार होता. मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार असून सध्या तरी हे सामने स्थगित करण्यात आलेत.