आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह ४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. उमंग व्हाईच गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. मात्र, वेळेवर न फेडता आल्यामुळे हे कर्ज एनपीए घोषित करण्यात आले.
दरम्यान, कंपनीच्या संचालकांनी बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.