शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आलेले मशाल चिन्ह निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने हे तात्पुरत्या स्वरूपात दिलेले चिन्ह पुढच्या आदेशापर्यंत शिवसेना ठाकरे गटाला वापरता येईल असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हे चिन्ह काढून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटले आहे.
समता पार्टी बिहार मधील राजकीय पक्ष असून त्यांचेही मशाल चिन्ह आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले तर उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे पक्षाचे नाव आणि ‘मशाल’ हे पक्ष चिन्ह दिले.
याविरुद्ध ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, “मशाल चिन्ह हे आमचे आहे, आम्ही त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत. उद्धव ठाकरेंनी दुसरे चिन्ह मागावे,” असे समता पक्षाचे अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटले आहे. यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला होता.