भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज दुपारी 12 मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. भाजपसह महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगावातून दुसऱ्यांदा उमेदवारी न मिळालेले खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात सामील होणार आहे. उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटात प्रवेशाची गेले अनेक दिवस चर्चा होती. काल त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची भेटही घेतली होती.
भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार
भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पवार आणि त्याचे अनेक सहकारी, पदाधिकारी आज मातोश्रीवर 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटात प्रवेशामुळे जळगावची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. शिवसेनेला हमखास विजयाच्या दिशेने नेणारा आजचा पक्षप्रवेश आहे, असं संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
जळगावातून शिवसेनेचा खासदार लोकसभेवर निवडून जाईल
जळगावचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. पक्षप्रमुख आज किंवा उद्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करतील. त्यानंतर सर्वांना कळेल की, जळगावची निवडणूक कोण लढणार. उन्मेष पाटलांच्या प्रवेशाने जळगावची शिवसेना मजबूतीने पुढे जाईल. त्यांची ताकद आणि शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावातून शिवसेनेचा खासदार लोकसभेवर निवडून जाईल, यावर शंका नाही, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.