उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये खासगी कंपन्यांतील कामगारांचा संताप अखेर समोर आला आहे. नियमानुसार 8 तासांचे काम असते, मात्र कंपन्यांकडून 10 ते 12 तास राबवून घेतलं जातं. तसेच या ओव्हरटाईमचा पगारही दिला जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
सुरुवातीला शांततेत सुरू असलेलं आंदोलन अचानक हिंसक झालं आणि अनेक ठिकाणी तोडफोड, दगडफेक आणि वाहनांना आग लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाढती महागाई बघता नोएडासारख्या शहरात किमान 18 ते 20 हजार रुपये पगार असावा, तरच किमान जीवन जगता येईल असं मत आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं.
ओव्हरटाईम करण्यास नकार दिला तर कंपनीचे अधिकारी शिवीगाळ करतात, अपमान करता अशी तक्रारही कर्मचाऱ्यांनी केली. ओव्हरटाईमचे पैसेही दिले जात नाहीत. कंपन्यांच्या इतर स्टाफचे वेतन दरवर्षी हजारोंमध्ये वाढतं, मात्र आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना मात्र 100 ते 200 रुपयांची वाढ दिली जाते, असा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन दुर्लक्षित राहिल्यानं कामगारांचा रोष वाढला. अखेर रस्त्यावर उतरलेल्या जमावाने दगडफेक, तोडफोड आणि वाहनं जाळण्याचे प्रकार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि वाहतूक व्यवस्थाही कोलमडली.
कामगारांनी प्रशासनासमोर काही ठोस मागण्या मांडल्या आहेत:
वेळेवर पगार
किमान वेतन वाढवणं
ओव्हरटाइमला दुप्पट मोबदला
साप्ताहिक सुटी अनिवार्य
कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुविधा.
दरम्यान या मागण्यांवर प्रशासनाने चर्चाही सुरू केली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थिती बिघडताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रशासनाने कामगार आणि कंपन्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी बैठक घेतली असून कामगारांसाठी नवीन नियम लागू करण्याचे संकेत दिले आहेत.