एकीकडे काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये आईस्क्रीममध्ये माणसाचं बोट आढळल्याची घटना ताजी असताना नोएडातील एका महिलेला अमूल आईस्क्रीमच्या डब्यात मृत गोम आढळली. डेअरी प्रोडक्ट निर्माती प्रसिद्ध कंपनी अमूलवर मोठा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अमूल कंपनीच्या आईस्क्रीममध्ये गोम आढळल्याची तक्रार एका महिलेने केली आहे.अमूल कंपनीने आता या तक्रारीची दखल घेतली आहे.
महिलेकडून परत मागवलाआईस्क्रीमचा डबा
अमूल कंपनीकडे डेअरी प्रोडक्ट्ससाठीचा एक विश्वासू ब्रँड म्हणून ओळखलं जातं. पण, या तक्रारीमुळे आता अमूल प्रोडक्ट्सच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नोएडातील एका महिलेने अमूल कंपनीच्या आईस्क्रीमचा टब ऑर्डर केला होता. हा आईस्क्रीमच्या डबा उघडताना महिलेला आतमध्ये मृत गोम सापडली. आता अमूल कंपनीने टेस्टिंगसाठी आईस्क्रीम टब परत मागवला आहे.
आईस्क्रीमचे पैसे परत, तक्रारीची घेतली दखल
आईस्क्रीममध्ये गोम आढळून आल्याचे प्रकरण अमूलला कळताच कंपनीने तात्काळ कारवाईसाठी पाऊल उचलली आहेत. महिलेला पैसेही परत करण्यात आले आहेत.या प्रकरणाची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनीही तपास सुरू केला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन इन्स्टंट डिलिव्हरी ॲपद्वारे महिलेने आईस्क्रीम ऑर्डर केली होती. महिलेने आईस्क्रीमचा टब उघडला तेव्हा तिच्या आत एक गोम असल्याचा दावा महिलेने केला आहे. महिलेने तत्काळ ॲपच्या ऑनलाइन हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केली. त्यानंतर त्यांना पैसे परत करण्यात आले.
अन्न विभागाकडून प्रकरणाचा तपास सुरू
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न सुरक्षा विभागाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अन्न आणि पुरवठा विभागाचे पथक ज्या दुकानातून आईस्क्रीम पाठवले होते, तेथे पोहोचले आणि आईस्क्रीम विक्रीवर बंदी घातली. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं अन्न आणि पुरवठा विभागाने सांगितलं आहे.