अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील नेवाडा राज्यातील लास वेगास शहरातील न्यायालयात एका आरोपीने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान महिला न्यायाधीशावर उडी मारून हल्ला केल्याने गोंधळ उडाला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा महिला न्यायाधीशांनी आरोपीच्या विरोधात निकाल देण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने वेगाने धावत घेत महिला न्यायाधीशांच्या टेबलावर उडी मारली आणि त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात न्यायाधीशांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात त्यांचे संरक्षण करणारा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. सुरक्षारक्षकाच्या खांद्यालाही दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना नवीन वर्षात 3 जानेवारी रोजी घडली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डिओब्रा रेडन हा लास वेगासचा रहिवासी असून तो एका गंभीर गुन्ह्यात आरोपी होता. तो त्याच खटल्यात हजर होता, ज्यावर न्यायाधीश मेरी के. होल्थस सुनावणीनंतर निकाल देत होत्या. न्यायाधीशांनी रेडनला दोषी घोषित करताच आणि त्याला शिक्षा सुनावणार इतक्यात आरोपी धावत आला आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला.
कोर्टरूमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आरोपी न्यायाधीशांच्या दिशेने धावत असतानाच न्यायाधीश मेरी होल्थसला धोका जाणवला आणि त्या आपल्या खुर्चीवरून उठल्या आणि मागे झाल्या. मात्र तितक्यात आरोपी टेबलावर चढला आणि त्यांच्या अंगावर उडी मारली.
या हल्ल्यात न्यायाधीश किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर शेजारी उभ्या असलेल्या न्यायाधीशांच्या सुरक्षारक्षकाला गंभीर दुखापत झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रेडेनला पकडून तिथेच बेदम मारहाण केली आणि त्याला कोर्टरूमच्या बाहेर घेऊन गेले.