उत्तर प्रदेशातील नोएडा येथे कारने एका दीड वर्षाच्या चिमुरडीला चिरडल्याची घटना समोर आली आहे . अंगावर शहारे आणणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलगी घराबाहेर खेळत असताना कारने तिच्या आईसमोरच तिला चिरडलं. मुलीची प्रकृती गंभीर असून तिला कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , नोएडाच्या सेक्टर 63 ए मध्ये हा प्रकार घडला. महिला आपल्या घरासमोर दीड वर्षाच्या मुलीसह खेळत होती. दोघीही रस्त्याच्या कडेला खेळत होत्या. याचवेळी एक कार तिथे येते आणि वळण घेते. पण हे वळण घेत असताना तरुण रस्त्याशेजारी बसलेल्या मुलीला पाहतच नाही. त्याची कार थेट मुलीच्या अंगावरुन निघून जाते. अचानक कार आल्याने महिलेला मुलीला बाजूला घेण्यासाठी वेळही मिळत नव्हती. काही सेकंदात हे सगळं घडतं आणि नंतर एकच आरडाओरड सुरु होते.

सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, तरुण कारचालक यानंतर बाहेर येतो. दुसरीकडे महिला आपल्या मुलीला उचलून धायमोकळून रडत असते. तिचा आवाज ऐकून इतर लोकही गर्दी करतात. यानंतर त्याच कारमधून मुलीला कैलाश रुग्णालयात नेण्यात येतं. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल कऱण्यात आलेली नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.