पंतप्रधान मोदी आज छत्तीसगडमध्ये भाजपचा प्रचार करत आहेत. यावेळी प्रचारसभेत त्यांचं भाषण सुरू असताना अचानक त्यांचं लक्ष गर्दीमधील एका मुलीकडे गेलं. या मुलीने पंतप्रधान मोदींचं स्केच आपल्या हातात धरलं होतं. ती दोन्ही हात उंचावून मोदींना हे स्केच दाखवत होती. यानंतर पंतप्रधानांनी एसपीजी सुरक्षारक्षकांकडून हे पोर्ट्रेट मागवून घेतलं.
या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय, की या मुलीला पाहून पंतप्रधान आपलं भाषण थांबवतात, आणि तिला काय हवं आहे हे विचारतात. त्यावर हे पोर्ट्रेट मला तुम्हाला द्यायचंय असं ती मुलगी म्हणते. त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणतात, की कुणीतरी आमच्या एसपीजी गार्ड्सपर्यंत ते पोर्ट्रेट पोहोचवा.
यानंतर ती मुलगी आपलं स्केच एका महिला सुरक्षा अधिकाऱ्याकडे देते. तेवढ्यात पंतप्रधान मोदी या मुलीला पोर्ट्रेटच्या मागे आपलं नाव आणि पत्ता लिहायला सांगतात. मी तुला नंतर नक्की पत्र लिहेल, असंही मोदी या मुलीला म्हणतात. यानंतर दुसऱ्या बाजूला आणखी एक व्यक्ती आपण तयार केलेलं पंतप्रधानांचं स्केच दाखवते. पंतप्रधान मोदी ते पाहून भारावून जातात.