देशात सध्या नीट परीक्षेवरून उफाळलेला वाद आणि cjp ने पुकारलेले आंदोलन यावरून मोठा गदारोळ सुरु असून दिल्ली पोलिसांनी सोमवारी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चात दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान आता cjp संस्थापक अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
दिल्ली पोलिसांनी सोमवारी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चातील तरुण आणि तरुणींना अमानुषपणे मारले. दिल्ली पोलिसांनी 12 वर्षांच्या मुलीचं डोकं फोडलं, 15-16 वर्षांच्या मुलींचे गळे पकडले होते. मी एका मुलीला पोलिसांनी मारताना स्वत: बघितले आहे. या मुलीचे कपडे पोलिसांनी फाडले आणि तिला छातीवर पाय देऊन मारले. एका मुलीच्या गळ्यावर पोलिसांनी काठीचे फटके मारले आहेत. त्यामुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना आंदोलनातील विद्यार्थ्यांचे खून करायचे आदेश देण्यात आले होते का? धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आणखी मुलांचे खून करायचे आहेत का, असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेयांनी केला. ते मंगळवारी दिल्लीच्या जंतरमंतर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आम्हाला काल आमचा संसद मार्च मागे घ्यावा लागला. पोलिसांनी आणखी मुलांचं डोकी फोडू नयेत, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. सरकारला मुलांच्या जिवाची चिंता नाही हे काल समजले. काल दिल्ली पोलीस ज्याप्रकारे काठ्या फिरवत होते, मुलांची डोकी फोडत होते, यावरुन एक लक्षात येते की, त्यांना आदेश होता की, कोणाचा जीव गेला तरी चालेल, पण या लोकांना इतकं मारा की, पु्न्हा यांनी सरकारला प्रश्नच विचारले नाही पाहिजेत. पोलिसांना वॉटर कॅनन वापरता आले असते, पण पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले.
दिल्ली पोलिसांच्या लाठीमारात 150 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जी विद्यार्थिनी गळ्यावर काठ्या मारल्याने गंभीर जखमी आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिचं काही बरं-वाईट झालं तर त्याला पंतप्रधान मोदी जबाबदार असतील. दिल्ली पोलीस जंतरमंतर परिसरात तपासणी केल्याशिवाय कोणाला सोडत नाहीत. मग काल जंतरमंतरवर दगडाने भरलेले ट्रक कुठून आले. याचा अर्थ दिल्ली पोलिसांनी काल व्यवस्थित प्लॅनिंग केले होते. काल पोलिसांसोबत सिव्हिल ड्रेसमध्ये गुंडही लाठीमार करत होते. पोलिसांनी सोनम वांगचूक यांची पत्नी गीतांजली मॅडम यांच्यावर हल्ला केला. संदीप लांबा नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे केस खेचले. माझ्यावरही लाठीमार झाला, असे अभिजीत दिपके यांनी सांगितले.