बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. बाळाच्या जन्मानंतर अभिनेत्रीला ‘बॉडी-शेमिंग’चा मोठ्या प्रमाणात सामान करावा लागत आहे. दरम्यान आता पहिल्यांदाच अभिनेत्रीने या बॉडी शेमिंगवर मौन सोडलं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या गणपती उत्सवादरम्यान, बाळाच्या जन्मानंतरच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर ती पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या दिसून आली. कतरिनाने पती विकी कौशलसोबत नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या मुलाचे, विहानचं स्वागत केलं होतं. या काळात, काही सोशल मीडिया युजर्सनी कतरिनाचे गरोदरपणापूर्वीचे आणि नंतरचे फोटो शेअर करून तिच्या दिसण्यातील बदलांची तुलना केली . एवंच नव्हे तर तिच्या शरीराबाबत भाष्य केले; यामुळे अभिनेत्रीला ‘बॉडी-शेमिंग’चा मोठ्या प्रमाणात सामान करावा लागला. मात्र अनेक जणांनी तिला पाठिंबा दिला. अभिनेता अली जफर, सोनारिका भदोरिया आणि शिवलिका ओबेरॉय यांसारख्या कलाकारांनी यासंदर्भात कतरिनाला पाठिंबा दर्शवला. अंबानींच्या गणेशोत्सवातही कतरिना विकीसोबत आली होती, मात्र तिच्या लूक वरून बरीच उलटसुलट चर्चा झाली, तिला ट्रोल करण्यात आलं.
या सर्वांदरम्यान आत्तापर्यंत कतरिनाने मौन बाळगलं होतं, पण आता तिने एका मुलाखतीत मातृत्वानंतर आपल्या त्वचेत झालेले बदल आणि स्वतःच्या दिसण्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन यावर भाष्य केलं आहे. माझ्यासाठी सुंदर दिसणं म्हणजे फक्त वरकरणी चांगलं दिसणं नव्हे, तर आतून चांगले वाटलं पाहिजे, असं ती म्हणाली.
एका मुलाखतीत कतरिना स्पष्टपणे बोलली. ‘सर्वात उत्तम दिसणे’ म्हणजे तिच्यासाठी काय, हे देखील तिने नेमकेपणानं सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, ‘गरोदरपणानंतर माझी त्वचा अधिकच संवेदनशील झाली होती. माझ्यासाठी तो काळ आव्हानात्मक होता, कारण माझ्या त्वचेसाठी कोणती उत्पादनं योग्य आहेत हे मला शोधून काढावं लागत होतं. मी अशी उत्पादने शोधत होते जी माझ्या त्वचेला आराम देतील आणि त्वचेचं आरोग्य पूर्ववत करण्यास मदत करतील’ असं कतरिना म्हणाली,
खरं सौंदर्य म्हणजे काय ?
बॉलिवूडमध्ये आल्यापासून ‘सर्वात उत्तम दिसणं’ याबद्दलची माझी व्याख्या बऱ्याच अंशी बदलली आहे, असं कतरिना कैफने सांगितलं. ” जेव्हा मी मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले, तेव्हा सौंदर्याचे काही ठराविक निकष होते. पण आता, ‘सर्वात उत्तम दिसणे’ ही गोष्ट ‘सर्वात उत्तम वाटणे’ याच्याशी जोडली गेली आहे. आणि उत्तम वाटण्यासाठी मी स्वतःची पूर्णपणे काळजी घेण्यावर भर देते.” असं कतरिनाने नमूद केलं.
स्वतःला अधिक चांगलं वाटावं यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन करते, हे देखील कतरिनाने सांगितले. ” संतुलित आहार घेणे, शरीरातील दाह नियंत्रणात ठेवणं, ॲक्टिव्ह राहणं, मेडिटेशन, सकाळी एक तास फोनपासून दूर राहणं आणि उठल्याबरोबर नैसर्गिक सूर्यप्रकाश घेणं— या सर्व गोष्टींचा माझ्यावर खूप सकारात्मक परिणाम होतो. याचा प्रभाव माझ्या त्वचेवरही दिसून येतो. माझा असा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही आतून निरोगी असता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआपच तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वातून दिसून येतो” असं कतरिनाने नमूद केलं.