मराठा समाजाने पुकारलेला नाशिक बंद शांततेत
मराठा समाजाने पुकारलेला नाशिक बंद शांततेत
img
Dipali Ghadwaje

नाशिक - जालना येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, उद्या जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये बंद पाळण्यात येणार आहे. तर काल रात्री देवळा येथे नागरिकांनी कॅण्डल मार्च कडून निषेध केला आहे.

दोन दिवसांपूर्वी जालना येथे अंतरवाली सराटी या गावी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणा दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारी आणि लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नाशिकमध्ये मराठा महासंघ, स्वराज्य संघटना, किसान सभा, तसेच इतर हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंदचे आयोजन करण्यात आले होते.

या बंदला मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाली असून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सकाळी काही प्रमाणात रस्त्यावर गर्दी सुरू होती. परंतु अकरा वाजेनंतर बाजारपेठेमध्ये काही प्रमाणात दुकाने उघडली होती. परंतु सर्वपक्षीय आणि विविध संघटनांच्या नेत्यांनी शहरातील गाडगे महाराज पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत फेरी काढून दुकान बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर दुकानदारांनीही या फेरीला प्रतिसाद देऊन आपली दुकाने बंद केली. शहरातील पंचवटी, मेरी म्हसरुळ,   नाशिक रोड, सिडको, सातपूर, आदींसह अन्य परिसरामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, जिल्ह्यातील चांदवड येथे बंदचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी देखील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन फेरी काढून नागरिकांना बंदचे आवाहन केले. जिल्ह्यातील इगतपुरी, कळवण, सटाणा, सिन्नर त्रंबकेश्वर या भागामध्ये देखील बंदचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी देखील संमिश्र प्रतिसाद बंदला मिळाला आहे.

यावेळी जालना येथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. येवला येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यामध्ये सोमवारी येवला तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही अनुचित प्रकार शहर आणि जिल्ह्यात घडलेला नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोणताही प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
nasik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group