त्र्यंबकेश्वर - बम बम भोले, भगवान त्रंबकराज की जय असा जयघोष करत हजारो भाविकांनी आज पहिल्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करून भगवान त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले.
श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या मंदीरात मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदीरातही भाविक मोठया संख्येने येत असतात. त्र्यं बकेश्वर नगरी गजबजुन गेली होती.
दर्शनाची रांग पूर्व दरवाजापासून गोरक्षनाथ मठाच्या बाजूने बडा उदासिन आखाडया पर्यंत गेली होती. देणगी दर्शनाची रांग ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत आलेली होती. 3 ते 4 तास दर्शनासाठी लागत हौते. दुपारी भगवान त्र्यंबकेश्वर पालखी कुशावर्त कुंडावर नेण्यात आली. यावेळी याठिकाणी पंचमुखी सोन्याच्या मुखावटयाला स्नान करुन पुजा आरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, पप्पू शेलार, रुपाली भुतडा, सत्यप्रिय शुक्ल, मनोज थेटे, समीर वैद्य आदी कर्मचारी उपस्थित होते. तर त्रिंबक नगर परिषदेचे वतीने मुख्याधिकारी श्रीया देवचके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मेनरोड भागामध्ये राबविलेल्या अतिक्रमण मोहीमेमुळे रस्त्यांनी मोकळा श्र्वास घेतला. रस्त्यावरील हातगाडेही हटविण्यात आले होते.
पहिल्या सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस विभागाने बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उप अधीक्षक कविता फडतरे, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांंनी नियोजन केले होते. शहरात 20 पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी 200, होमगार्ड 350, वाहतूक पोलीस कर्मचारी 20, साध्या वेशातील कर्मचारी 10, एटीसी कर्मचारी 10 याप्रमाणे बंदोबस्त तैनात होता.
व्हिडिओ पाहण्यासठी खाली क्लिक करा