नाशिक (भ्रमर प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी असलेला २०० रुपये किंमतीचा बनावट पास ७०० ते १००० रुपय दराने विकून काळाबाजार करणार्या पाच जणांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ऑनलाईन पास व्यवस्थेत असलेले दोष काढून टाकून सुधारणा करावी, असे आवाहन पोलिसांनी मंदिर प्रशासनाला केले आहे. दरम्यान, बनावट पास चढ्या भावाने विकणार्या टोळीने पाच हजारांवर भाविकांची लाखोंची फसवणूक फसवणूक केल्याचे त्यातून उघडकीस आले आहे.
याबाबत माहिती अशी की, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविकांची गर्दी असते. सध्या उत्तर भारतीयांचा श्रावणमास सुरू असून, महाराष्ट्रातील भाविकांचा देखील श्रावण शुक्रवारपासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन २०० रुपये किंमतीचा बनावट पास ७०० ते १००० रुपयांना विकला जात असल्याच्या तक्रारी भाविकांकडून आल्या होत्या.
त्र्यंबकेश्वर मंदिरात मोफत दर्शन रांग आणि देणगी दर्शन रांग अशा स्वतंत्र रांगा असून, गर्दीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पासमध्ये काळाबाजार होत असल्याची भाविकांच्या तक्रारी होत्या. या तक्रारींचा दखल घेऊन जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील आणि मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी स्थानिक पोलिसांना ऑनलाईन दर्शनपास काळ्याबाजाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलिसांनी तपास करून गुप्त माहितीच्या आधारे पाच आरोपींना अटक केली आहे. त्यात दिलीप नाना झोले, सुदाम राजू बदादे (दोघे रा. पेंगलवाडी)तसेच समाधान झुंबर चोथे (रा. रोकडोबा वाडी), शिवराज दिनकर आहेर (रा. निरंजनी आखाड्याजवळ त्र्यंबकेश्वर)आणि मनोहर मोहन शेवरे (रा. रोकडोबा वाडी) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आजवर १६४८ बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले. त्यातून एकूण सुमारे पाच हजार भाविकांना बनावट पास चढ्या भावाने विकल्याचे त्यातून लाखो रुपये कमवल्याचे निष्पन्न झाले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अदित्य मिरखेलकर, पेठ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवी मगर, त्र्यंबकेश्वरचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावीत, हवालदार जाधव, हवालदार मुळाणे, कॉ. ठाकरे, बोराडे आणि राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्र्यंबकेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात आढळून आले की, त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ऑनलाईन पास काढण्याच्या सिस्टीमध्ये काही दोष आहेत. त्यात सुधारणा करण्याची सूचना करण्यात आली आहे.