Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा! ; निकाल 'या' तारखेला
Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा! ; निकाल 'या' तारखेला
img
दैनिक भ्रमर
नवी दिल्ली :

लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर  केल्या आहेत. देशात लोकसभेचे निवडणूक दि. 19 एप्रिल ते दि. 1 जून दरम्यान पार पडणार आहे. एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. केंद्रामध्ये पुन्हा कोण सत्तेत येणार हे 4 जून रोजी लागणाऱ्या निकालामधून स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून देशात आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि सुखबीर सिंह यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमारही यावेळी उपस्थित होते.


महाराष्ट्रात मतदान कधी?

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 26 एप्रिल 7 मे, 13 मे, 20 मे आणि 25 मे मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.

नेमकं  काय म्हणाले निवडणूक आयुक्त ?

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आम्ही निवडणूक आयोगामधील सर्व अधिकारी या लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहोत. त्यामुळे भारतीयांनीही मोठ्या संख्येनं या निवडणुकीच्या मतदानामध्ये सहभागी होऊन आपल्या बोटांना शाई लावून घ्यावी असं आवाहन केलं आहे. 16 जून रोजी संपत असून त्यापूर्वी निवडणुका पार पाडणं ही आमची जबाबदारी आहे. या निवडणुका लोकशाही मार्गाने पार पडाव्यात यासाठी पोषक वातावरण देण्याची आमची जबाबदारी आहे, असं राजीव कुमार म्हणाले. देशभरातील 800 हून अधिक जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वत: चर्चा केली आहे, असंही राजीव कुमार म्हणाले आहेत. निवडणुका पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्षपणे होतील असं आश्वासन निवडणूक आयुक्तांनी दिलं.


असे असतील निवडणुकीचे टप्पे

पहिला टप्पा - 19 एप्रिल 21 राज्यांमध्ये मतदान होणार

दुसरा टप्पा - 26 एप्रिल रोजी एकूण 21 राज्यांमध्ये मतदान होणार

तिसरा टप्पा - 7 मे रोजी एकूण 12 राज्यांमध्ये मतदान पार पडणार

चौथा टप्पा - 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

पाचवा टप्पा - 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

सहावा टप्पा -  25 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

सातवा टप्पा -  1 जून रोजी मतदान पार पडणार आहे.

भारतामधील मतदार किती?

भारतात होणारी लोकसभेची निवडणूक ही जगातील सर्वाधिक मतदार असलेल्या देशातील निवडणूक ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील 96 कोटी 88 लाख लोक मतदान करण्यास पात्र आहे. 97 कोटी लोकांपैकी 47 कोटी 10 लाख महिला आहेत. मतदानासाठी पात्र असलेल्या भारतीयांमध्ये 49 कोटी 70 लाख पुरुष आहेत. भारतामध्ये 48 हजार 44 तृतीयपंथी मतदार आहेत.  देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल 10.5 लाख मतदानकेंद्र उभारली जाणार असल्याचंही निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. मतदानासाठी पात्र असलेले 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या 1 कोटी 84 लाख इतकी असल्याचंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं. 82 लाख प्रौढ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. 100 वर्षांपेक्षा अधिक वयोगटाचे 2 लाखांहून अधिक मतदार आहेत. मागील म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 90 कोटी भारतीय मतदान करण्यासाठी पात्र होते. त्यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये 6 कोटींहून अधिक मतदारांची भर पडली आहे. 1.5 कोटी निवडणूक अधिकारी या निवडणुकीचं काम पाहणार आहेत. 55 लाख ईव्हीएम वापरल्या जाणार असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group