स्ट्राँग रुममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरीचा प्रयत्न, निलेश लंके म्हणाले कुंपणच आता शेत खातंय; व्हीडिओ केला ट्विट
स्ट्राँग रुममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरीचा प्रयत्न, निलेश लंके म्हणाले कुंपणच आता शेत खातंय; व्हीडिओ केला ट्विट
img
Dipali Ghadwaje
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जवळपास दररोज काही ना काही समस्या समोर आणल्या जात आहेत. यामध्ये ईव्हीएम यंत्रांच्या सुरक्षेविषयी विरोधकांकडून वारंवार सवाल उपस्थित केले जात आहेत. यामध्ये आता शरद पवार गटाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके यांची भर पडली आहे. निलेश लंके यांनी एक व्हीडिओ ट्विट करत नगरच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

निलेश लंके यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात. मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातंय. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका निलेश लंके यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता. तब्बल अर्धा तास हे सीसीटीव्ही फुटेज दिसत नव्हते. त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार  गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, काहीवेळानंतर हे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा मॉनिटरवर दिसू लागले होते. मात्र, या अर्धा तासात कोणीही स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करु शकतो, असा आरोप विरोधकांनी केला होता. 

अखेर याविषयी स्पष्टीकरण देताना निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले होते की, स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली नव्हती. केवळ सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या वादावर पडदा पडला होता. परंतु, आता नगरमधील घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group