रामगिरी महाराज यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केला खळबळजनक आरोप, म्हणाले...
रामगिरी महाराज यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केला खळबळजनक आरोप, म्हणाले...
img
दैनिक भ्रमर
सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या रामगिरी महाराजांच्या वार्षिक सप्ताह सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी चालू आहे. याच दरम्यान महाराजांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कीर्तनामधून आक्षेपार्ह वत्तव्य केल्याच्या आरोपावरून महंत रामगिरी महाराज यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मात्र मंहत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला असून रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि काही जिल्ह्यात या मागणीवरून तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.

“काल महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना अपमानित करणारे, त्यांचे चारित्र्य हनन करणारे विधान मुद्दामहून केले, असे माझे मत आहे. कारण, कोणत्याही महंताने कोणत्याही प्रेषिताबाबत असे उद्गार काढणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत तुम्ही कोणत्याही संतसाहित्य उघडून बघा; संतांच्या अभंगांचे पुस्तक उघडून बघा; संत कबीर, संत रविदास, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पुस्तके उघडून बघा, तुम्हाला कुठेही धर्मद्वेष दिसणार नाही. किंबहुना, या सर्वांची शिकवणच होती की,सर्व धर्मांनी एकत्र राहिले पाहिजे. असे असताना महंत रामगिरी हे ज्या पद्धतीने बोलले आहेत; त्याकडे पाहता, हे शब्द मुद्दामहून त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले, असेच होते”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

तसेच , जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “मी जे म्हणतोय त्याला अर्थ आहे. कारण, मागे स्वतः मुख्यमंत्री बसलेले असताना, हे महंत एवढे बोलण्याची हिमंत दाखवत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते. ते जाऊ द्या ! पण, महाराष्ट्रातील धार्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्य त्यानिमित्ताने हे सत्ताधारी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. हा खेळ आता महाराष्ट्राला जाळून टाकेल; महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवून टाकेल अन् हा खेळ महाराष्ट्राला परवडणार नाही.”


इतर बातम्या
Join Whatsapp Group