गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वडोदरामध्ये पुराच्या पाण्यात काही ठिकाणी मगरी आढळल्या.
पूरग्रस्तांच्या मदतकार्यासोबतच मगरींना पकडण्याचं काम प्रशासनाकडून सुरु आहे. मगरींना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडलं जात आहे.
याच दरम्यान, एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मगरीला दुचाकीवरून घेऊन जाताना 2 व्यक्ती दिसत आहेत. एक्सवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिण्यात आलं आहे की, 'त्या मगरीलासुद्धा टूव्हीलर राईडचा हा अनुभव नेहमी लक्षात राहील. विश्वामित्र नदीमधून बाहेर पडलेल्या एका मगरीला वन विभागाकडे सोपवण्याचं काम हे दोन तरुण करत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत असलेले हे दोन तरुण मगरीला वडोदऱ्याच्या वन विभागातील अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी निघाले आहेत. ही मगर नदीतून बाहेर आली आहे. या मगरीचं तोंड आणि शेपटीकडचा भाग दोरीने बांधण्यात आला आहे. त्यामुळे त्या मगरीला असं पकडून घेऊन जाणं शक्य आहे.
वडोदरामध्ये अनेकदा लोकांना पाण्यात मगर दिसण्याचे प्रकार घडले आहेत. अकोटा स्टेडियमच्या जवळ एका घराच्या छतावर मगर दिसली होती. वडोदऱ्यातील एका कॉलेजजवळही मगर आढळली होती. अनेकांनी या तरुणांच्या धाडसाचं कौतुक केले आहे.