भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून जगात आपली प्रतिष्ठा उंचावली आहे. विशेषत: चंद्राच्या ज्या भागात आजपर्यंत कोणीही पोहोचलं नाही, तिथे चांद्रयानने पाऊल ठेवलं आणि भारताने इतिहासात नाव कोरलं.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमुळे हे सगळं शक्य झालं आणि यामुळेच लोक इस्रोमधील वैज्ञानिकांशी संबंधित सर्व गोष्टी इंटरनेटवर शोधत आहेत. यातील एक गोष्ठ म्हणजे इस्रो संस्थेत काम करणाऱ्यांचा पगार. तर याच पार्श्वभूमीवर इस्रोच्या वैज्ञानिकांना किती पगार मिळतो? हे जाणून घेऊया.
शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये अनेक पदांवर लोक कार्यरत आहेत. लोकांना इस्रोमध्ये विविध पदांसाठी नोकरी मिळते, यासाठी अगदी शिपाई पदापासून ते शास्त्रज्ञ भरतीसाठी वेगवेगळ्या स्तरावरील परीक्षा घेतल्या जातात. इस्रोमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी पगारही वेगवेगळा आहे.
उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती इस्रोमध्ये अभियंता (Engineer) म्हणून रुजू झाली, तर त्याचा प्रारंभिक पगार 37,400 ते 67,000 पर्यंत असतो. याउलट, जर तुमची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ या पदासाठी भरती झाली, तर तुमचा प्रारंभिक पगार 75,000 ते 80,000 दरम्यान असेल. आता हा सांगितलेला पगार हा त्या पदासाठीचं मूळ वेतन आहे, म्हणजेच त्यात विविध प्रकारचे भत्ते जोडले तर हा पगार एक लाखांच्या जवळपास पोहोचेल.
इस्रोमध्ये काम करणाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त कोणत्या सुविधा मिळतात?
इस्रोच्या शास्त्रज्ञांना पगारासह अनेक सुविधा मिळतात, ज्या तुम्हाला कोणत्याही खासगी नोकरीत मिळणार नाहीत. सामान्य सरकारी नोकरीतही अशा सुविधा मिळत नाहीत. इस्रोमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना घर , वाहतूक , सुरक्षा अशा गोष्टी पुरवल्या जातात. यासोबतच ते थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करतात, त्यामुळे त्यांचा पगारही वेळेवर येतो.
इस्रोमध्ये 'या' पदावरील लोकांना मिळतो सर्वाधिक पगार
इस्रोमध्ये काही पदं आहेत, ज्यावर नोकरी करणाऱ्यांना सर्वाधिक पगार मिळतो. हा पगार कोणत्याही IAS किंवा IPS पेक्षा जास्त आहे. इस्रोमधील वैज्ञानिक/अभियंता-एसएफ, वैज्ञानिक/अभियंता-एसजी, वैज्ञानिक/अभियंता-एच, उत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि प्रतिष्ठित शास्त्रज्ञ ही काही पदं आहेत ज्यांना सर्वाधिक पगार आहे. त्यांचं मूळ वेतन पाहूया.
इस्रोमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचा पगार
प्रतिष्ठित शास्त्रज्ञ: 2,05,400
उत्कृष्ट शास्त्रज्ञ: 1,82,200
शास्त्रज्ञ/अभियंता - H: 1,44,200
शास्त्रज्ञ/अभियंता - SG: 1,31,100
शास्त्रज्ञ/अभियंता - SF: 1,18,500