भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. कारण, ज्या चांदोमामाच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, त्या चंद्रावर भारताचं चांद्रयान-३ यान आज लँडिग करणार आहे. या ऐतिहासिक क्षणाकडे देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. भारताचे ‘प्रग्यान’ (रोव्हर) आणि विक्रम (लँडर) हे दोघे बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. भारताच्या चंद्रमोहिमेला यश मिळू दे अशी सदिच्छा असंख्य लोक व्यक्त करत आहेत.
अशातच चांद्रयान-3 ची मोहिम यशस्वी होण्यासाठी देशभरातील नागरिक प्रार्थना करत असतानांच नाशिकच्या चांदीच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरातही चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी महाआरती आणि पूजा करण्यात येत आहे. चांद्रयान सुरक्षितपणे चंद्रावर उतरावं आणि मोहीम यशस्वी यासाठी गणपतीला साकडं घालण्यात आलं आहे. हातात तिरंगा झेंडा घेवून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महाआरती करण्यात आली .
दरम्यान चांद्रयान-3 आज म्हणजेच 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. प्रक्षेपणानंतर 22 दिवसांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. यासह भारत इतिहास रचणार असून असे करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. एवढेच नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.
चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक
भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे या साठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला यासाठी दूध दही विविध फळांचे रस सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला. आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे यासाठी हा अभिषेक करण्यात आला. याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले. मोहीम यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली.
चांद्रयान 3 च्या चंद्रावर लॅंडिंगची वेळ आता जवळ आली आहे. चांद्रयान बुधवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या शक्तीपेक्षा सुमारे सहा पटीने कमी आहे. त्यामुळे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यातच इस्रोने चांद्रयानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आत्तापर्यंत कोणत्याच देशाचे यान यशस्वीरित्या उतरू शकलेले नाही.
नुकतेच 20 ऑगस्टला, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान तेथे उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले. त्यामुळे आता भारत या मोहिमेत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल.