राज्य सरकारने दिशाभूल थांबवावी, महाराष्ट्राची माफी मागावी काँग्रेसची मागणी
राज्य सरकारने दिशाभूल थांबवावी, महाराष्ट्राची माफी मागावी काँग्रेसची मागणी
img
दैनिक भ्रमर

 नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल काँग्रेस पक्षाने निषेध नोंदविला. काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा दिल्या व जे दोषी आहेत, त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करून राज्य सरकार व केंद्र सरकारने जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली.

राजकोट (मालवण) येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, हे आगामी निवडणुकीत महायुतीच्या सरकारचे काय होणार, याचे प्रतीक आहे. या सरकारने उद्घाटने केलेल्या अनेक प्रकल्पांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे दिसून आले आहे. पूल कोसळले, रस्ते तुटले, महामार्गांवर खड्डे झाले येथपर्यंत सहन करणे शक्य होते; मात्र तमाम मराठी माणसांचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत असे दुर्दैवी प्रकार घडावेत, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र दुखावला आहे.

मालवण येथे बसविण्यात आलेल्या पुतळ्याबाबतच अनेकांना संशय आहे. छोट्याशा वार्‍यामुळे पुतळा कसा पडू शकतो व त्या पुतळ्याचे तुकडे कसे होऊ शकतात, हे सर्व संशयास्पद वाटते. गुणवत्ताहीन काम असल्यामुळेच हे सर्व झाले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने जनतेची माफी मागावी, तसेच तातडीने पुन्हा नव्याने पुतळा उभारावा, यासह अन्य मागण्या करीत उग्र आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन नाशिक शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली.

याप्रसंगी राहुल दिवे, स्वप्नील पाटील, विजय राऊत, सुरेश मारू, स्वाती जाधव, वसंत ठाकूर, विजय पाटील, प्रा. भालचंद्र पाटील, प्रा. आदिनाथ नागरगोजे, संतोष ठाकूर, गौरव सोनार, भारत पाटील, फारुख मन्सुरी, जावेद इब्राहिम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 


इतर बातम्या
Join Whatsapp Group