३ ऑक्टोबर २०२३
नाशिक (प्रतिनिधी) :- 11 एकर जमीन खरेदी करून देतो, असे सांगून एका दाम्पत्याने तरुणास 90 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जेम्स प्रसाद वरसाला (वर 36, रा. हरीनिवास, आनंदनगर, नाशिकरोड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जेम्स वरसाला यांना जमीन खरेदी करायची होती. त्यासाठी ते चांगल्या जागेचा व जमिनीचा शोध घेत होते. यादरम्यान आरोपी पद्माकर घुमरे व त्यांची पत्नी सुनीता घुमरे ऊर्फ सुनीता भंडारे यांनी वरसाला यांच्याशी संपर्क साधला व चांगल्या ठिकाणी तुम्हाला चांगली जमीन मिळवून देतो, असे सांगितले. त्यानुसार घुमरे दाम्पत्याने त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यादरम्यान आरोपी दाम्पत्याने वरसाला यांना दि. 2 मे 2014 ते 30 सप्टेंबर 2014 या कालावधीत नाशिक येथे भोसला कॉलेजजवळ थाटलेल्या ऑफिसमध्ये बोलावले. त्यादरम्यान वरसाला यांना दोन्ही आरोपींनी संगनमत करून वाडीवर्हेजवळ 11 एकर जमीन खरेदी करून देतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून वरसाला यांनी घुमरे दाम्पत्याशी आर्थिक व्यवहाराची बोलणी केली. त्याप्रमाणे घुमरे दाम्पत्याने वरसाला यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार वरसाला यांनी वेळोवेळी सांगितलेत्या खात्यावर सुमारे 90 लाख रुपये जमा केले.
त्यानंतर घुमरे दाम्पत्याने दरवेळी बँक खात्यातून ही रक्कम काढून घेतली; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम देऊनही आरोपी दाम्पत्याने वाडीवर्हे रेथील जमिनीची खरेदी न देता वरसाला यांनी जमीन खरेदीपोटी दिलेले पैसे स्वत:च्या फायद्याकरिता वापरून फसवणूक केल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर फिर्यादी यांनी घुमरे दाम्पत्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली; मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली.
अखेर जेम्स वरसाला यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात घुमरे दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाने करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar