नो व्हेईकल डेनिमित्त जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त पायी चालत कार्यालयात
नो व्हेईकल डेनिमित्त जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त पायी चालत कार्यालयात
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक शहर प्रदूषणमुक्त करण्याचा संदेश देण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त या अधिकार्‍यांनी आपल्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत कोणतेही वाहन न वापरता पायी जात नो व्हाईकल डे चे संदेश नागरिकांना दिला.

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नवीन वर्षापासून दर सोमवारी प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यासाठी म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपल्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत पायी चालत यावे किंवा सायकलीवरून यावे, असे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार दि. 6 जानेवारी हा पहिला सोमवार असल्यामुळे याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री हे दोघे जण आपले त्र्यंबक रोडवरील शासकीय निवासस्थानापासून पायी निघाले.

मनपा आयुक्त मनीषा खत्री या मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनापर्यंत चालत येऊन कार्यालयात पोहोचल्या, तर जिल्हाधिकारी जलज शर्मा हे राजीव गांधी भवन सीबीएस या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयात पायी येऊन आपल्या दुसर्‍या मजल्यावरील कार्यालयात गेले. हाच कित्ता गिरवीत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे देखील महात्मानगर येथील आपल्या शासकीय निवासस्थानापासून गंगापूर रोडवरील असलेल्या आपल्या पोलीस आयुक्त कार्यालयात पायी चालत पोहोचले व त्यांनी कामकाजाला सुरुवात केली.

या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबरच अन्य अधिकारी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, किरणकुमार चव्हाण यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी सोमवारी नो व्हेईकल डे साजरा करून प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला आहे. नाशिक शहराला प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने ही संकल्पना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सुरू केली आहे. यामुळे एक सकारात्मक उदाहरण नागरिकांसमोर आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group