दहा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या 'त्या' क्लासचालकाचे घर जाळण्याचा प्रयत्न
दहा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या 'त्या' क्लासचालकाचे घर जाळण्याचा प्रयत्न
img
दैनिक भ्रमर
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या खासगी क्लासचालकाचे घर मध्यरात्रीच्या सुमारास ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पवन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की परदेशी हे दि. 24 ऑगस्ट रोजी रात्री गुन्हेशोध पथकात कर्तव्यावर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदळे, पोलीस शिपाई मते व कारंजे यांच्यासह एमएच 15 जेएस 6881 या क्रमांकाच्या सीआर मोबाईल गाडीने अंबड हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

त्यावेळी पोलीस हवालदार आव्हाड यांनी रात्री 10 वाजता फोन करून सांगितले, की अंबड पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्ह्यातील आरोपी कृष्णा दहिभाते (वय 32, रा. ज्ञानेश्‍वरी क्लासेस, उपेंद्रनगर, सिडको, नवीन नाशिक) याच्या राहत्या घरावर सात ते आठ अनोळखी इसमांनी दगडफेक करून वात लावलेल्या काचेच्या बाटल्यांत काही तरी ज्वलनशील द्रव्य टाकून त्या बाटल्यांची वात पेटवून कृष्णा दहिभाते याच्या घरावर फेकून त्याचे घर पेटविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली.

त्यानंतर सीआर मोबाईल टीमसह पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता तेथे जमलेल्या लोकांपैकी प्रेम शिंदे या नावाच्या व्यक्तीने इसमाने सांगितले, की दहिभाते याच्या घरासमोर आलेल्या सात ते आठ लोकांनी वात पेटलेल्या बाटल्या घरावर फेकल्या व ते तेथून पळून गेले. दरम्यान, विनयभंगाचा प्रकार घडल्यानंतर आरोपी कृष्णा दहिभाते याच्या घरातील सर्व सदस्य हे घरातून बाहेरगावी निघून गेल्याची माहिती घरातील लोकांकडून मिळाली.

दरम्यान, अज्ञात सात ते आठ लोकांनी दहिभाते याचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न करून मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण करणारी कृती केल्याप्रकरणी सात ते आठ लोकांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group