बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन आणि 'परफेक्शनिस्ट' अभिनेते आमिर खान यांच्याबाबत मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन्ही अभिनेत्यांच्या नावावर नोंदणी असलेल्या दोन आलिशान कारमुळे बेंगळुरूमध्ये मोठा टॅक्स वाद निर्माण झाला आहे. कर्नाटक मोटार वाहन कायद्यांतर्गत रोड टॅक्स न भरल्याबद्दल तब्बल 38.26 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
काही वर्षांपूर्वीत बिग बी अमिताभ बच्चन आणि आमीर खाननं आपापल्या लग्झरी कार्स इतरांना देऊन टाकलेल्या. तरीसुद्धा अजूनही या कार्स अमिताभ बच्चन आणि आमीर खानच्याच नावानं रजिस्टर आहेत. या कारचे खरे मालक बिझनेसमन आणि राजकारणी युसूफ शरीफ आहेत, ज्यांना 'केजीएफ बाबू' म्हणून ओळखलं जातं. शरीफ यांनी अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्याकडून काही वर्षांपूर्वी लक्झरी कार्स खरेदी केल्या होत्या, पण अजूनपर्यंत नोंदणीचं काम पूर्ण केलं नाही, ज्यामुळे त्या अजूनही बच्चन आणि खानच्या नावावर रजिस्टर आहेत.
कर्नाटक सरकारच्या बेंगळुरू आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत एवढ्या मोठ्या रकमेचा दंड ठोठावला आहे. तसेच युसूफ शरीफने यांनी जर या प्रकरणात वैध कागदपत्रे सादर केली नाहीत, तर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही आरटीओ अधिकारी यांनी दिला आहे.
कर्नाटकातील मोटर वाहन अधिनियमानुसार, राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या वाहनांना स्थानिक पातळीवर पुन्हा नोंदणी करावी लागेल आणि रस्ता कर भरावा लागेल. बिग बींच्या मॉडेलला 18.53 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, तर आमिर खानच्या मॉडेलला 19.73 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दोघांवरही कर्नाटकच्या वाहन नोंदणी आणि रस्ता कर नियमांचं दीर्घकाळ पालन न केल्याचा आरोप आहे.
या आलिशान कार कागदपत्रांवर अजून जरी अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या नावावर असल्या तरी, दोन्ही कलाकारांनी त्या अनेक वर्षांपूर्वी विकल्या होत्या. अमिताभची 'फँटम' 2019 मध्ये विकली गेली होती, तर आमिरच्या 'घोस्ट'ची विक्री नेमकी कधी झाली याबाबत स्पष्टता आलेली नाही. या प्रकरणात दोन्ही कलाकारांचा थेट संबंध नाही, परंतु त्यांच्या नावांमुळे याप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.