बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांचे भोपाळ येथे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. पण बच्चन कुटुंबियांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने हे सगळे चुकीचे असल्याचे सांगितलं आहे. बच्चन कुटुंबांनी जया बच्चन यांच्या आईची तब्बेत सुखरुप असल्याची माहिती दिली आहे. त्या सुखरुप असून त्यांची उत्तम तब्बेत असल्याचं सांगण्यात आलंय. अभिषेक बच्चनच्या टीमने देखील यावर अधिकृत माहिती देत इंदिरा भादुरी सुखरुप असल्याचं सांगितलं आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांचं भोपाळमध्ये निधन झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. इतकंच नव्हे तर अभिषेक बच्चन तातडीने भोपाळला रवाना झाल्याचं म्हटलं जात होतं. बुधवारी दिवसभर इंदिरा यांच्या निधनाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. अनेकांनी त्यावर शोकसुद्धा व्यक्त केला. मात्र ही या चर्चा केवळ अफवा असल्याचं बच्चन कुटुंबीयांनी स्पष्ट केलंय. जया बच्चन यांची आई इंदिरा या जिवंत असून त्यांची प्रकृतीसुद्धा ठीक आहे, असं बच्चन कुटुंबाने म्हटलंय.
बच्चन कुटुंबीयांकडून स्पष्टीकरण
“सध्याच्या घडीला जया बच्चन आणि त्यांच्या कुटुंबात कोणाचंही निधन झालेलं नाही. आम्ही चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी भ्रामक चर्चांवर विश्वास ठेवू नये. दिशाभूल करणाऱ्या आणि विश्वासार्ह नसलेल्या माहितीबद्दल योग्य पडताळणी करून घ्या. अशा अफवा पसरतात तेव्हा कुटुंबावर प्रचंड भावनिक आघात होतो. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवून कुटुंबाची अडचण आणखी वाढवू नका. आम्ही प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी बच्चन कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि भविष्यात विश्वसनीय स्रोताकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा”, असं बच्चन कुटुंबीयांनी स्पष्ट केलंय.
जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. इतकंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसून त्यांनी भोपाळमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचं म्हटलं जात होतं. या खोट्या वृत्तांवर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार यांनीसुद्धा या खोट्या वृत्ताबद्दल नाराजी व्यक्त केली. “माझ्यानंतर आता जया यांच्या आईबद्दल अशा बातम्या पसरवल्या जात आहेत का? जेव्हा एखाद्याच्या आयुष्याशी संबंधित बातमी असते, तेव्हा ती फॉरवर्ड करण्याआधी लोकांना अधिक काळजी घेतली पाहिजे, संवेदनशीलतेनं वागलं पाहिजे”, असं त्या म्हणाल्या.