सोलापूर : गरीब गरजूंना मदत व्हावी या हेतूने सरकार विविध योजना राबवते. मात्र आता याच योजनांबाबत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय . सध्या शासनाच्या वतीने सध्या महसूल सप्ताह राबवला जात आहे. त्याअंतर्गत संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील नव्या लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. तसेच तलाठ्यांमार्फत शासनाच्या योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे एक लाख ५७ हजार लाभार्थी आहेत. डिसेंबर २०२४ पासून प्रत्येक लाभार्थींना योजनेचा लाभ 'डीबीटी'द्वारे थेट दिला जात आहे. पण, त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना त्यांची कागदपत्रे शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाकडे जमा करावी लागणार आहेत. जे लाभार्थी आधार प्रमाणीकरण करून त्यांची वैयक्तिक कागदपत्रे डीबीटी पोर्टलवर जोपर्यंत अपलोड करीत नाहीत, तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ मिळणारच नाही.
शासनाच्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीसाठी दरमहा अनुदान दिले जाते. त्यांना अडचणी येऊ नयेत हा त्यामागील हेतू आहे. तरीपण, तीनपेक्षा जास्त महिने होऊनही एखादा लाभार्थी योजनेचे बँक खात्यातील रक्कम घेऊन गेलेला नसल्यास त्यांची रक्कम बँकांमार्फत पुन्हा शासनजमा केली जात आहे. शासनाचे तसे आदेश आहेत. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांच्या अधिकाऱ्यांनी बँकांना पत्रव्यवहार केलाआहे.