श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय : मुलींच्या खात्यात जमा होणार  १० हजार , नेमकी काय आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना?
श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय : मुलींच्या खात्यात जमा होणार १० हजार , नेमकी काय आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना?
img
दैनिक भ्रमर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली. अवघ्या काही महिन्यातच या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १,५०० रूपये दिले जातात.

लाडकी बहीण योजनेसह सरकारच्यावतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून मुलीच्या पालकांना ५० हजार रूपयांचे अनुदान शासनतर्फे देण्यात येते. अशातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे गरजू महिलांसाठी नवीन योजना राबविण्यात येणार आहे.

"श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी" योजना असे योजनेचे नाव असून, या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली आहे. लवकरच याचा फायदा गरजू महिलांना होणार आहे.

योजना नक्की कुणासाठी? 

राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू होणार आहे. या योजनेचा लाभ ८ मार्च म्हणजेच (आंतरराष्ट्रीय महिला दिन) रोजी जन्मलेल्या मुलींना मिळणार आहे. राज्यातील शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या नावाने १० हजार रूपयांचे फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांच्या मातांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

न्यास समितीकडून या अभिनव योजनेस मंजूरी देण्यात आली आहे. शासनाच्या मान्यतेनंतर योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. शासनाच्या मान्यतेनंतरच या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group