लासलगाव : लासलगांव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या गेली तीन महिने वेतन नसल्याने आणि लासलगाव सरपंचपदाची स्वाक्षरी बाबत प्रशासन कोणतेच निर्णय घेत नसल्याने 13 मार्चपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल आणि निफाड पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी आमरण उपोषण करतील असा निर्वाणीचा इशारा असलेले निवेदन निफाडचे गटविकास अधिकारी यांना दिल्याने आता लासलगावकरांसमोर ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. साफसफाई बंद राहिल्यास नवे संकट उभे राहणार आहे.
यापूर्वी दिनांक 1 मार्च रोजी लासलगाव ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निवेदन देऊनही प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी काहीच निर्णय घेत नाहीत. त्यामुळे हे अखेरचे पाऊल कर्मचारी यांना वेतन अभावी उपासमार होत असल्याने उचलले आहे.
आज दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत लासलगांव येथील कर्मचाऱ्यांचे मागील ३ महिन्यांपासुन वेतन मिळालेले नसल्याने उपोषण करण्यासंदर्भात लेखी निवेदनाद्वारे कळविलेले होते. परंतु लासलगांव येथील सरपंचपदाच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन मिळताच कळविण्यात येईल असे कळविले आहे. परंतु अद्यापपावेतो कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा योग्य मार्गदर्शन मिळालेले नसल्याने उद्या जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती निफाड येथील अधिकारी वर्गाचा वेळ काढुपणाच्याआणि संदिग्ध पत्रव्यहार करण्याच्या विरोधात लासलगांव येथे प्रथम निषेध करण्यात येणार आहे.
तसेच दि. १३ मार्चपासुन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणारे सर्व प्रकारचे काम बंद (पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती विभाग, सामान्य प्रशासन) ठेवुन काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायत लासलगांव येथील कर्मचाऱ्यांना मागील ३ महिन्यापासुन वेतन नसल्याने कर्मचारी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. तसेच बँक हप्ते, एलआयसी हप्ते आणि महत्वाच्या बाबी प्रलंबीत राहिलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन हे अत्यल्प असुन तेही वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. कर्मचाऱ्यांना वैद्यकिय सेवा घेणे देखील जिकरीचे झालेले आहे. तसेच त्यांचे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
निफाडचे गट विकास अधिकारी यांनी दिनांक १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात उचित कारवाई न झाल्यास किंवा योग्य मार्गदर्शन प्राप्त न झाल्यास सदरचे दिवशी ११ वाजेनंतर पंचायत समिती निफाड येथे ग्रामपंचायत लासलगांव येथील सर्व महिला पुरुष कर्मचाऱ्यांसह आपले दालनामध्ये उपोषणास बसणार असल्याचा इशारा देऊन जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नाही तो पर्यंत ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.असे म्हटले आहे.