लासलगाव (भ्रमर वार्ताहर) :- गेल्या तीन आठवड्यांपासून तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झाल्याने ही समस्या त्वरित सोडवावी, या मागणीसाठी शनिवारी झालेल्या लासलगाव बंदमध्ये सहभागी होत कडकडीत बंद पाळला.
मात्र या बंदनंतर वालदेवी, मुकणे व दारणा या धरणांतून नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी सोडून तूर्त लासलगावकरांची मागणी पूर्ण केली आहे.
लासलगावसह लाभार्थी सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लिकेजमुळे बंद होती. ही पाईपलाईन दुरुस्त होत नाही तोच लासलगावला पाणीपुरवठा करणारे नांदूर मध्यमेश्वर धरण कोरडे पडले. अशा अनेक अडचणींमुळे गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ लासलगावकर पाण्यापासून वंचित होते. याच्या निषेधार्थ शनिवारी समस्त लासलगावमधील व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या आस्थापना बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला.
पाईपलाईन लिकेज, मोटार नादुरुस्त होणे, वीजपुरवठा खंडित व धरणाने गाठलेला तळ या विविध समस्यांमुळे लासलगावकरांना अनेक दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. लहान लहान मुले महिला व पुरुष वर्ग आपले काम धंदे सोडून हंडाभर पाण्यासाठी वणवण करताना दिसत होते.
लासलगाव व परिसरातील नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मग्न असून, सर्वसामान्य नागरिक मात्र स्वत:च्या पाणी प्रश्नासाठी लढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठक घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली; मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला.
यानंतर प्रशासन खडबडून जागे होत तत्काळ उपाययोजना करून वालदेवी, मुकणे व दारणा धरणातून पाणी सोडून लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी सोडले.